बीड

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; परळी कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामागच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, आता परळी जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात हे वॉरंट बजावण्यात आले आहे.

न्यायालयाने राज यांना अनेकदा सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे राज यांना या प्रकरणात जामीन मिळूनही, ते सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे यांना तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले आहे.

6 एप्रिल रोजी हे वॉरंट बजावूनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे परळी न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटवर तरी पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय राज ठाकरे पुढे काय करणार? सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागून घेणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.