महाराष्ट्र

आजान होणार नाही, काकड आरती बंद करू नका- जामा मशिद ट्रस्ट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- मशिदीत पहाटे आजान होणार नाही, मात्र साई मंदिरातील काकड आणि शेजआरती बंद करू नका, असे पत्र जामा मशिद ट्रस्टसह मुस्लिम समाज बांधवानी दिले आहे. यामुळे राज्यात असलेल्या हिंदु – मुस्लिम सौख्य दिसून आले आहे. शिर्डीतील मुस्लिम समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे वातावरण ढवळून निघाले होते. राज ठाकरेंनी भोंग्यावरून 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आज राज्यभरातील बांधवानी सामजस्याची भूमिका घेत आज भोंग्यावर अजान घेतली नाही. आणि हिंदु मुस्लिम सौख्य जपले आहे.

सध्या भोंगावाद व सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशामुळे मशिदी बरोबरच साई मंदिरावरील भोंगे रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात आले आहेत. येथील मशिदीत नमाज झाली पण अजाणसाठी कोणीही स्पीकर वापरला नाही. मात्र गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली हे अतिशय वेदनादायक आहे. साईबाबा देवस्थान हे जागतीक किर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. साईबाबांच्या द्वारकामाई मशिदीवर गेली सव्वाशे वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला हिरवा व भगवा ध्वज एकत्रित लावला जातो.

रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबरच संदलचीही मिरवणूक असते. रोज सकाळी दहा वाजता हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहतात. येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याला या भोंगावादाने गालबोट लागणे योग्य नाही. येथे देश-विदेशातून भाविक येतात. या मंदिरावर पंचक्रोशितील हजारो नागरीकाची रोजीरोटी अवलंबून आहे. या जागतीक किर्तीच्या देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता ते पुर्ववत सुरू ठेवावे व विशेष बाब म्हणून त्यास मान्यता देण्यात यावी अशी विनंती आहे. असे जामा मशिद ट्रस्टचे सय्यद इब्राहिम हुसेन यांनी म्हटले आहे.