बीड

आईच्या मदतीने पोराने केला बापाचा खुन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पोराने आईच्या मदतीने बापाचा खुन केल्याची घटना केज तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली. या प्रकरणी मायलेकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दहा दिवसांपूर्वी पोराने आईच्या मदतीने बापाला लाकडी दांड्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बापावर बीड आणि नंतर पुण्यात उपचार सुरू होते.

उपचार सुरू असताना रविवार दि. २ मे रोजी रात्री पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी काल गुन्हा दाखल झाला आहे. रमेश सोनाजी शिंदे (वय ३८ वर्षे रा. बेंगळवाडी ता. केज) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेशचा भाऊ बाबूराव यांच्या फिर्यादीनुसार रमेश आणि त्याची पत्नी हिराबाई, मुलगा ऋषिकेश यांच्यात पैशावरून नेहमी वाद व्हायचे, त्यातून या दोघांनी रमेशला मारहाण केली.

२३ एप्रिल दुपारी ४ वाजता त्यांच्यात पुन्हा पैशावरून वाद झाला. हिराबाई आणि ऋषिकेश हे दोघे रमेशकडे खर्चासाठी पैसे मागत होते. मात्र पैसे नसल्याने रमेशने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ऋषिकेशने लोखंडी दांड्याने वडिलाच्या डोक्यात हल्ला केला. यात रमेश गंभीर जखमी झाला तरी देखील ऋषिकेशने मारहाण सुरूच ठेवली. या वेळी बाजुला उभा असलेली हिराबाई ही रमेशला आणखी मार म्हणून चिथावणी देत होती.

रमेशचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी उपचारासाठी नेकनूर आणि नंतर बीडच्या रुग्णालयात नेले मात्र रमेशची प्रकृती चिंताजनक बनली असता त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवले. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी दुपारी ४ वाजता रमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिराबाई आणि ऋषिकेश या दोघांवर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.