महाराष्ट्र

मोठी बातमी! निवडणुकांचं बिगुल वाजणार; सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

4 May :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी आहे. पंधरा दिवसांच्या आत निवडणुका जाहीर कराव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे. ओबीसी आरक्षणामुळं राज्य सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करून निवडणुका लांबणीवर ढकलल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत, अशी भूमिका राज्यातील महाविकास आघाडी सरकारची होती. त्याला प्रमुख विरोधी पक्ष भाजपनेही पाठिंबा दिला होता. त्याचदरम्यान, सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील १५ दिवसांत जाहीर करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.