महाराष्ट्र

राज ठाकरे बुजगावणे; जयंत पाटलांची तिखट टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 May :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे बुजगावणे असल्याची तिखट टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. ‘भाजप काही बुजवाण्यांना पुढे करुन देशातील ज्वलंत प्रश्नांवरुन लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेची नाराजी उफाळून येऊ नये यासाठी हे राजकीय भोंगे वाजवण्यात येत आहेत,’ असे ते म्हणालेत.

राज ठाकरेंवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही ​​​​​राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका कायम असल्याने जयंत पाटील यांनी त्यांना फटकारले आहे. या प्रकरणी त्यांनी राज यांचे नाव न घेता त्यांना बुजगावण्याची उमपा दिली आहे.

सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज यांच्यावर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरेंनी दिलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या 4 एप्रिलच्या अल्टीमेटमवरुन पोलिसांनी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून यानंतर जयंत पाटील यांनीही राज यांना लक्ष्य केले.

भाजपकडून काही बुजगावण्यांना पुढे करत सध्याच्या मुख्य प्रश्नापासून विचलीत करत आहेत. जनतेमधली नाराजी उफाळून येऊ नये म्हणून सध्या या राजकीय भोंगे वाजवण्याचे काम सुरु आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

4 तारखेला मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही तर मग मी ऐकणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत बोलताना दिला होता. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मनसेकडून उद्या राज्यात कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही असे म्हटले आहे. जर असे काही करण्याचा प्रयत्न झाला तर पोलिस योग्य ती कारवाई करतील असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यातील तरुणांचे करिअर खराब करण्याचे काम कोणीही करु नये. घोषणा देणारे, चिथावणी देणारे आपली कामे करत असतात. परंतू तरुण रस्त्यावर उतरुन आपले करिअर खराब करतात. त्यामुळे कोणीही अशा चिथावणीला बळी पडू नये असा सल्ला जयंत पाटील यांनी तरूणांना दिला आहे. दरम्यान बोलत असताना जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डेसिबलची मर्यादा न पाळणाऱ्या भोंग्यांवर कारवाई नियमाप्रमाणे केली जाईल असेही स्पष्ट केले आहे.