महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 May :- चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबदेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेत मनसेची सभा झाली या सभेत 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे आणि आयोजकांनी केले असा आरोपही ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला जात असून त्यांना अटक होणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर मुंबईतील मशिदीसमोर गृहविभागाने कमांडो सुरक्षा तैनात केली आहे. एकीकडे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दुसरीकडे मनसेने उद्या रस्त्यावर उतरणार आहे त्यामुळे मशिदींना सुरक्षा देण्यात आली आहे. राज ठाकरेंवर गुन्हा नोंद झाल्यानंतर भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला आहे.

सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर पोलिस कारवाई करतील, असा इशाराही दिला होता. औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आणि चार मे रोजी दिलेल्या अल्टीमेटवर चर्चा यात होणार असून उद्या राज्यभरात मनसे रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेता यावरही बैठकीत दिशा ठरणार आहे.

औरंगाबादेत राज ठाकरे यांच्यासह गुन्हा दाखल झालेले मनसे पदाधिकारी राजीव जावळेकर यांना अमित ठाकरे यांचा काॅल आला असून गुन्ह्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. यानंतर राजीव जावळेकर म्हणाले की, कायदा सर्वांना सारखाच असायला हवा. पोलिसांनी सभास्थळी 15 हजार लोकांना परवानगी दिली, मुळातः राज ठाकरे रस्त्यावरून चालले तरीही पंधरा हजारांवर लोक जमा होतात मग पोलिसांनी दिलेली अटीचा भंगच होणार असेही राजीव जावळेकर म्हणाले.

रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. राज यांची वक्तव्य तपासल्यानंतर त्यात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आल्याचे आढळून आले. यासह सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचे पालन झाले, कशाचे उल्लंघन झाले, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि नियमभंग केल्याबाबतचा अहवाल गृहखात्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. या अहवालाचा आढाव घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2012 मधील हे प्रकरण आहे. सांगलीत मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी आता शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे.

सभेची परवानगी मागणारे राजीव जावळीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी-शर्थींचा भंग केला म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे. काय होऊ शकते कारवाई चिथावणीखोर भाषण, दोन गटांत तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळतील त्यांना अटक होऊ शकते. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. पोलिसांना यात जामीन देण्याचा अधिकार नाही, यासाठी न्यायालयात जावे लागेल.

या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कलम 116, 117, 153 भारतीय दंड विधान 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये राज ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून त्यानुसार राजीव जावळीकर व इतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.