महाराष्ट्र

म्हणून राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी आक्रमक भाषण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. या सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला कितीही शिव्याशाप दिले तरी चालतील मात्र राज ठाकरे यांनी सामान्य लोकांना बेजार करणाऱ्या महागाईवर बोलावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपताच ठाकरे यांचे औरंगाबाद येथील भाषण सुरू होते यामागे माध्यम व्यापण्याची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांच्यावर बोलले तर हमखास प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवार यांच्यावर बोलतात. त्यांना हिंदूं-मुस्लिम यांच्या विकासाचे देणेघेणे नाही. महागाई किती वाढली आहे, पेट्रोल, डिझेल किती महाग आहे, यावर राज ठाकरे का नाही बोलत? गॅस,सीएनजी, स्टील, सिमेंटचे दर वाढले किती वाढले. महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. आम्हाला काही वाटणार नाही. त्यामुळे महागाई वर न बोलता बाकी गोष्टींवर राज ठाकरे बोलत असल्याने यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाने लिहून दिलीय असे दिसते.

भाजपाला अडचणीत आणणाऱ्या एकाही मुद्दयावर राज ठाकरे बोलत नाहीत. आपण भाजपावर का बोलत नाही याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकत नाहीत. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणता तरी दबाव असल्याने आणि त्यांनी फक्त शरद पवारांवर बोलायचे, बाकी काही बोलायचं नाही असे सांगितले गेले असल्याने ते केवळ शरद पवार यांच्यावर बोलतात,” असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.