पुन्हा माही! जडेजाने सोडले CSK चे कर्णधारपद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
30 April :- यंदाच्या आयपीएलमधील सुमार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार रविंद्र जडेजाने अवघ्या महिन्याभरातच आपले कर्णधारपद सोडले आहे. IPL सुरू होण्यापूर्वीच चेन्नईने जडेजाकडे कर्णधारपदाची धूरा सोपविली होती. ही धुरा आता पुन्हा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे आली आहे.
रविंद्र जडेजाकडे गत 24 मार्च रोजी CSK चे कर्णधार पद सोपवण्यात आले होते. पण, त्याच्या नेतृत्वात चेन्नईला चमकदार कामगिरी करण्यात साफ अपयश आले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 8 पैकी अवघ्या 2 सामन्यांत विजय मिळाला आहे. तर 6 सामन्यांत मानहाणीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता उर्वरित सामन्यांत धोनी पुन्हा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसून येईल.
CSK च्या निवेदनानुसार, रविंद्र जडेजाने आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच धोनीला सीएसकेचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यानंतर धोनीने त्याच्या विनंतीचा मान राखत चेन्नईचे कर्णधारपद स्विकारले.
रविंद्र जडेजा सामान्यतः आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो. पण, कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याची कामगिरी अत्यंत वाईट झाली होती. त्यामुळे त्याला चौफेर टीकेचा सामना करावा लागत होता. पण, यामुळे तो एवढ्या लवकर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल असे कुणालाही वाटले नव्हते.
जडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी दुसऱ्यांदा चेन्नईचे कर्णधारपद स्विकारेल. 33 वर्षीय जडेजा 2012 पासून चेन्नईच्या संघात आहे. गत 24 मार्च रोजी धोनीने अचानक आपले कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. तेव्हा जडेजा चेन्नईचा तिसरा कर्णधार झाला होता. तत्पूर्वी, आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून महेंद्र सिंह धोनी संघाचे कर्णधारपद सांभाळत होता.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा 213 पैकी 130 सामन्यांत विजय झाला. मधल्या काळात सुरेश रैनाने 6 सामन्यांत चेन्नईचे कर्णधारपद सांभाळले होते. त्यात संघाने केवळ 2 सामने जिंकले होते. 40 वर्षीय धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. त्यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.