बीड

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर! राज्यभर घेणार सभा, जिल्हाप्रमुखांनाही दिल्या सूचना

30 April :- उद्या औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मुंबईत आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली.

बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच इतर अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. तसेच, विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यभरात सभा घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याची सुरुवात मराठवाडा व मुंबईपासून होणार आहे. 14 मे रोजी मुंबईत बीकेसी येथे तर 8 जून रोजी मराठवाड्यात सभा घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव, धार्मिक-जातीय तेढ निर्माण करण्याची विरोधकांची नीती हाणून पाडण्यासाठी तसेच त्यांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी या सभा होणार आहेत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिली.

जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठकीबाबत माहिती दिली. शिवसेनेवर विरोधक तुटून पडले आहेत. मात्र, आमच्याकडेही फटाके आहेत. ते कसे फोडायचे हे आता पाहू, असे सुचक वक्तव्य राऊत यांनी केले. तसेच, सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांवर प्रतिहल्ला करावाच लागेल. त्यांचे ढोगांचे बुरखे फाडावे लागतील. त्यासाठी राज्यात दोन महत्त्वपूर्ण सभा उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यानंतर राज्यभरात सभा घेतल्या जातील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना दिल्या. तसेच, सध्याच्या राजकीय स्थितीत काय करणे आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले. याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, सध्या अनेक नवहिंदुत्ववादी जागे झाले आहेत. त्यांचा बुरखा फाडणे गरजेचे आहे. मात्र, ही पक्षांतर्गत बैठक असल्याने मुख्यमंत्र्यांनी याविषयी नेमके काय सांगितले, हे सांगणे उचित होणार नाही.

शिवसेनेकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल, हे मात्र नक्की, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोणीही घेरू शकत नाही. आम्हाला घेरणाऱ्यांचाच घेर किती छोटा आहे, हे पहायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.