महाराष्ट्र

मनसे आणि भाजपवर तुटून पडा; मुख्यमंत्री ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 April :- शिवसेना खासदार आणि प्रवक्त्यांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते असा प्रश्न विचारला आहे. तर भाजप आणि मनसेवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मनसे आणि भाजपवर शिवसेनेच्या खासदारांनी आणि प्रवक्तांनी आक्रमक भूमिका घ्या, असे आदेश दिले आहेत. तर मनसे आणि भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या आणि त्यांचे हिंदुत्व किती बोगस आहे. या संदर्भात लोकांना जागृत करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले काम लोकांपर्यंत पोहचवा असेही म्हटले आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयंतांनी जवळपास दीड तास राज्यातील विविध कळीच्या मुद्यांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोघांत खलबते झाल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंनी भोंगे काढण्यासंदर्भात 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. यातच त्यांची औरंगाबादेत 1 मे रोजी सभा आहे. या सभेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यावर काय तोडगा काढता येईल या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली आहे.