भारत

पुढील महिन्यात उन्हाचा तीव्र चटका सहन करावा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- मार्च महिन्यापासून सामान्यपणे उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवतो आहे. त्यातच उन्हाचा चटका सामान्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरू लागला आहे. त्यात आता हवामान खात्याकडून येत्या पाच दिवसांत राज्यात, विशेषत: विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एरवीच तापलेल्या विदर्भाला पुढील पाच दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

एकीकडे पाच दिवस उष्ण लहरींचा अंदाज असताना त्यातही ३० एप्रिल ते २ मे या कालावधीमध्ये तर तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील जनतेला पुढील किमान आठवडाभर उन्हाच्या झळांपासून स्वत:चं संरक्षण करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

कीकडे विदर्भात उष्ण आणि तीव्र उष्ण लाटांचा अंदाज असताना आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागामध्ये मेघगर्जनेचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मेघगर्जना होण्याचा अनुभव या भागात येऊ शकतो. उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे.

बहुतांश भागात तापमान ४० अंशांपार गेले असून, मुंबईजवळील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक भागात तापमान विदर्भाप्रमाणे ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण एप्रिलमध्ये उन्हाचा तीव्र चटका होता, आता महिन्याचा शेवटही तीव्र काहिलीतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे. या महिन्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या.

मुंबई आणि उपनगरांमध्येही एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. उत्तरेकडून सातत्याने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यातून तापमानात वाढ नोंदिवली जात आहे. बंगलाच्या उपसागरातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यातून उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट नोंदिवली जात होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव कमी होत आहे.