महाराष्ट्र

राणांच्या आईला अश्रू अनावर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या उद्देशाने मुंबई आलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. राणा दाम्पत्यानी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाकडून त्यांना कोणत्याही प्रकारे दिलासा मिळाला नाही.

तुरुंगातून राणा दाम्पत्यानी लवकरात लवकर बाहेर यावे, यासाठी अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी पूजा करण्यात आली. बडनेरा मतदान संघाचे आमदार रवी राणा यांचे आई-वडिल आणि त्यांची मुलगी पूजेला उपस्थित होते. यादरम्यान रवी राणाच्या आईचे अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या लोकांसमोर ढसाढसा रडू लागल्या होत्या. राणांच्या निवासस्थांनी पार पडलेल्या पूजेनंतर पुन्हा अंबादेवी मंदिरात महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

पूजेच्या आधी राणा दाम्पत्याची मुलगी आरोहीने घराबाहेर ‘जय श्री राम’ची रांगोळी काढली. खासदार नवनीत राणा जेलमध्ये जाण्याआधी सतत ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होत्या. राणा दाम्पत्याना 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीत आपल्या इतरही याचिका पडून आहेत, असे कारण देत न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत राणांचा याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या जेलमधून बाहेर येण्यासाठी केलेल्या पूजेनंतर त्यांची मुलगी आरोही म्हणाली की, “मी देवाकडे अशी प्रार्थना करते की, माझे आई-वडिल लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावे” अशी प्रार्थना आरोहीने केली आहे. राणा दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.