पंतप्रधान मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 April :- देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
“इंधनाच्या वाढत्या दरांचं ओझं देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. केंद्राने राज्यांनाही कर कमी करत नागरिकांना याचा फायदा द्यावा असं आवाहन केलं होतं. काही राज्यांना केंद्र सरकारची भावना लक्षात घेत कर कमी केला. पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहेच, मात्र शेजारच्या राज्यांचंही नुकसान करत आहे,” असं सांगताना नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि गुजरातची उदाहरणं दिली.
“नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काही राज्यांनी व्हॅट कमी केला. कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझं कायम राहिलं. या राज्यांनी किती महसूल कमावला हे मला सांगायचं नाही. पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे,” असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदींनी दिला. कोलकाता , हैद्राबाद, चैन्नई, मुंबई, जयपुर येथे इंधनाचे दर जास्त आहेत. दीवदमण मध्ये दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे असं मोदींनी सांगितलं.