महाराष्ट्र

कसा असणार राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 April :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एक मे रोजीच्या औरंगाबादमधील सभेसंदर्भात संभ्रम कायम आहे. आज सकाळी काही वृत्तवाहिन्यांनी औरंगाबादमध्ये जामवबंदी लागू केल्याचं वृत्तांकन केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राज ठाकरेंची एक मे रोजीची सभा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. असं असलं तरी या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी या सभेची तयारी सुरु केली आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज यांच्या दौऱ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. परवानगीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत, जमावबंदीची चर्चा आहे तर सभेत काही अडचणी निर्माण होऊ शकतात असं वाटतं का, असं सरदेसाईंना विचारण्यात आलं असता त्यांनी, “मी स्वत: या सभेबद्दल सकारात्मक आहे,” असं उत्तर दिलं. राज दौरा कसा असणार आहे? असा प्रश्न सरदेसाईंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सरदेसाई यांनी, “उद्या किंवा परवा पर्यंत मी आणि बाळा नांदगावकर तिथे जाऊ. त्यानंतर सभेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी तिथे पोहोचतील,” असं सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी पुणे दौऱ्यावर जाण्याची चर्चा आहे याबद्दल विचारण्यात आलं असता, “राज ठाकरे मुंबईहून पुण्याला जाणार आणि मग तिथून संभाजीनगरला येणार,” असं सरदेसाई म्हणाले.

“आमच्या सभेची पूर्वतयारी उत्तम प्रकारे सुरु आहे. संभाजी नगरचे आमचे पदाधिकारी, आमचे तिकडचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सभेची तयारी केलेली आहे,” असं सरदेसाई म्हणाले. पुढे बोलताना, “लोकांमध्ये, संभाजीनगरच्या आजूबाजूचे जिल्हे असतील मराठवड्यामधील सर्वांमध्येच या सभेबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे सभा रेकॉर्ड ब्रेक होणार हे नक्कीच. मला असं वाटतं की एक दोन दिवसांमध्ये परवानगी आमच्याकडे येईल. सभा ही होणारच,” असं सरदेसाई यांनी ठामपणे सांगितलं.

औरंगाबादमधील मनसेचे एक पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता नितीन सरदेसाई यांनी, “एखादी व्यक्ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्याने पक्षाला काही विशेष फरक पडत नाही,” असं उत्तर दिलं.

पुढे बोलताना, “पक्षाला उभारी घ्यायचीय. तुम्हाला दिसतय संपूर्ण वातावरण आता मनसेमय झालेलं दिसतंय महाराष्ट्रामधील. अयोध्या दौऱ्यामुळे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा आहे. त्यामुळे अशी एखाद दुसरी व्यक्ती चुकीची गोष्ट करत असेल तर येणाऱ्या काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर असा निर्णय त्या पदाधिकाऱ्याने घेतला असेल तर चुकीचा निर्णय आहे असं मला वाटतं,” असं नितीन सरदेसाई म्हणाले.