महाराष्ट्र

राणा दाम्पत्याचा दाऊद गँगशी संबंध- संजय राऊत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 April :- खासदार नवनीत राणा यांनी दाऊदशी संबंधित युसुफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी आज रात्री 8.30 वाजता याबाबत हिंदी आणि इंग्रजीतून ट्विट केले आहेत.

नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीने तपास करायला हवा. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचेही संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली का? असा सवालही संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

”तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. लकडावाला याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. युसुफ लकडावाला याचे डी. गँगशीही संबंध होते. माझा प्रश्न आहे की ईडीने याची चौकशी केली का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे” असेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे.

”हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ईडीने याची चौकशी करावी. मनीलाॅंड्रींग प्रकरणात नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख यांची चौकशी केली जाते पण नवनीत राणांची चौकशी का केली जात नाही” असा सवालही काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

”हनुमान चालिसाच्या नावाखाली स्वतःचा पाय नवनीत राणा यांनी खोलात घातला आहे. साळसुदपणाचा नवनीत राणा यांनी मुखवटा चढवला असून तो गळुन पडला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून हे प्रकरण समोर आणले आहे त्यामुळे पुढील दिशा संजय राऊत हेच ठरवतील” असेही शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितले.

”लकडावालाशी असलेला संबंध नवनीत राणा याच सांगु शकतील; पण शिवसेना नेते हवेतील बातम्या समोर आणत आहे. राणा दाम्पत्यांचा हनुमान चालिसा शिवसेनेच्या मर्मी लागला असून याच अविर्भावातून हे सर्व होत आहे का हे तपासणे आवश्यक आहे. दुखावलेल्या शिवसेना नेत्यांनी हे समोर आणले आहे का हेही तपासावे लागेल” असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

युसुफ लकडावाला बिल्डर आणि चित्रपट निर्माता होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व बॉलीवूड फायनान्सर म्हणूनही त्याची ख्याती होती. खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची 50 कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी लकडावाला याची ईडीने चौकशी केली. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी 28 मे 2022 ला अटक केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा आरोप लकडावालावरती लावण्यात आला होता. अटक झाल्यानंतर युसुफ लकडावालाला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पण 9 सप्टेंबर 2021 ला युसुफ लकडावालाचा मृत्यू झाला.