अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या; खोतांचा टोला
26 April :- अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे अशी आक्षेपार्ह टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींचं फार गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही म्हटलं. जातीभेद, जातीयवाद वाढवा, तोडा फोडा अशी राष्ट्रवादीची जुनी नीती आहे असा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर काही गंभीर आरोप केले. “या राज्यात शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला आहे. त्या नेत्याने आपली जात सांभाळायची.
कितीही भ्रष्टाचार करा, आम्ही तुम्हाला मंत्री करतो फक्त तुम्ही तुमची जात सांभाळा. शरद पवार कसे आपले तारणहार आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा हा धंदा महाराष्ट्रात गेल्या ४० वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राला आता हे कळालं आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.“महाविकास आघाडी विकास कामावर बोलायला तयार नाही. पोलिसांच्या बाळाचा वापर करुन दहशत दाखवत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना चिरडत आहेत. पण एक शकुनीमामा सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे.
ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्यांची सेना कौरवांची सेना असते आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार आणि कौरवांचा पाडवा थोड्या दिवसात झालेला महाराष्ट्राला दिसेल,” असा इशारा सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला. जागर शेतकऱ्याचा आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान २९ एप्रिलपासून कोकणातून सुरू करत आहोत. महाराष्ट्रामधील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्याच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. केवळ फालतूगिरी सुरू आहे.. हे सरकार भरतीवर बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितलं.
“राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. मातोश्री बाहेर डायलॉगबाजी करतील. एक आजीबाई आली आणि डायलॉगबाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रामध्ये अनेक आजीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसण्यासाठी वेळ मिळाला का?,” अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
“आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे.. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू. हनुमान चालिसा प्रकरणी राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यांच्या घरावर जमाव गेला, गुंडागर्दी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. मग शरद पवारांच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले? ते सर्वसामान्य लोक होते. हे राज्य गुंडाराज्य झाले आहे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.