राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिक आक्रमक
17 April :- सध्या राज्यात हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. महाविकास आघाडी विरुद्ध मनसे आणि भाजपा असा वाद सुरु झालाय. यात राणा दाम्पत्याने उडी टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिक जमले असून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे. तिथे येऊन कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. तसेच मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी दिली.
रवी राणा आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते. या आवाहनांना आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरेंनी काय वाचावं, काय करावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचं काम करा, असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.