उद्धव ठाकरेंची जागा आता राज ठाकरे घेणार; खा नवनीत राणांचा टोला
17 April :- हनुमान चालिसावरून एकीकडे अमरावतीमध्ये राजकारण पेटलेले असताना खासदार नवनीत राणा यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेनेला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. मात्र, राज ठाकरे आता हिंदुत्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज ठाकरेच पुढे नेत आहे. ते पुढे उद्धव ठाकरे यांची जागा घेतील, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी, अन्यथा त्यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा आमदार रवी राणा व नवनीत राणा यांनी दिला आहे. यावरून आज शिवसैनिकांनी नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे. त्यावर हिंदुत्वाच्या विचारांची आठवण करून दिली, म्हणून माझ्याविरोधात घोषणा दिल्या जाताय. मात्र, मी तर केवळ हिंदुत्वाचा प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी माझ्याविरोधात आणि रवी राणांच्या विरोधात मुर्दाबादचे घोषणा दिल्या, तरी मला त्याचे दु:ख वाटत नाही, असे राणा म्हणाल्या.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची विचारांना तिलांजली!
बाळासाहेब ठाकरे यांनी या देशात हिंदुत्वाची विचारसरणी रुजवली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ज्यादिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली, त्याच दिवशी त्यांच्यामधील हा विचार संपला का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. तसेच आम्ही एवढे आवाहन करूनही तुम्ही हनुमान चालिसा म्हटली नाही. यावरून तुम्ही हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचे स्पष्ट झाले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा व रवी राणा यांनी मुंबईत येऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. त्यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजूनही आमच्या डोक्यात आहेत. आम्ही त्यांच्याच विचारांवर चालणार आहोत. मात्र लालसेपोटी जे लोक विचारधारा सोडून देतात त्यांना आठवण करून देण्यासाठी काहीही झाले तरी मुंबईत जाणारच, असे राणा यांनी स्पष्ट केले. तसेच, आम्ही हनुमानाचे नाव घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने मुंबईत येत आहोत. त्यामुळे मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हण्ण्यावरून आम्हाला अडवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.