राज ठाकरे अल्टिमेटमवर ठाम! 5 जूनला अयोद्धेचा दौरा
17 April :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. भोंग्याचा मुद्दा हा धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. रमजाननंतर राज्यासह देशभरातील मशिदींनी भोंगे बंद करावेत, या आपल्या अल्टिमेटमवर आपण ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, यानंतरही मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर त्या मशिदींसमोर आम्ही भोंग्यावरून हनुमान चालिसा लावणारच. यासाठी जनतेने तयार रहावे, असा इशाराही त्यांनी दिला.
आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांसह 5 जूनरोजी अयोद्धेला जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेणार आहोत. तसेच, महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मेरोजी औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानामध्ये जाहीर सभा घेणार आहोत, अशी माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली. मात्र, अयोद्धेचा दौरा तसेच सभा नेमक्या कोणत्या विषयावर घेणार, याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, हा काही धार्मिक मुद्दा नाही. तो केवळ एक सामाजिक मुद्दा आहे. यावेळी राज ठाकरेंनी आपली एक आठवणही सांगितली. मशिदीजवळच घर असणाऱ्या एका कुटुंबात एक लहान मुल आजारी पडले होते.
रोजच्या 5 वेळच्या भोंग्यामुळे या मुलाला त्रास होत होता. त्यामुळे मुलाच्या कुटुंबाने मशिदीला भोंगे बंद करण्याची विनंती केली होती. आपला मुद्दाही अशाच प्रकारचा सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच माणुसकीच्या मुद्द्यावरून भोंगे बंद करावेत, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.