हुश्श ! शहरवासियांनी सोडला सुटकेचा निः श्वास ; किल्लेधारुर येथील सर्व अहवाल निगेटीव्ह.
किल्लेधारुर दि.३(प्रतिनिधी) किल्लेधारुर शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील ४० व्यक्तींचे स्वॕब मंगळवारी (दि.२) तपासणीसाठी स्व.विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज रात्री आला असून सर्वच अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
किल्लेधारुर शहरात औरंगाबादहून प्रवास करुन आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५३ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले होते. यांपैकी ४० जणांचे स्वॕब मंगळवारी (दि.२) आरोग्य विभागाच्या वतीने तपासणीसाठी स्व.विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले होते. यामध्ये केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून २२ तर स्वा.रा.ती. अंबाजोगाई येथून १८ अहवाल पाठविण्यात आले होते. या स्वॕबचे अहवाल आज बुधवारी रात्री आले असून सर्वच अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सर्वच अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे शहरवासियांनी सुटकेचा निः श्वास सोडला आहे.