सोमय्यांचा ठाकरे कुटुंबीयांवर नवा आरोप
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 April :- मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कंपनी श्रीजी होम्सच्या माध्यमातून 29 कोटींचे मनी लाँड्रिंग झाले. या कंपनीत ठाकरे कुटुंबीयांचा सहभाग आहे. त्यामुळे मनी लॉड्रिंगच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयांनाही लाभ झाला असे का म्हणू नये, असा गंभीर आरोप आज किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, उद्धव ठाकरे यांचा या कंपनीशी काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी करत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी याने ठाकरे कुटुंबीयांना मनी लॉड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधींचा फायदा करून दिला, असा गंभीर आरोपही किरीट सोमय्यांनी केला. आता फरार झालेला हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी याला कुठे लपवले आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनीच द्यावी व नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीने दीड डझनहून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबाला फायदा करून दिला. मात्र तो माणूस आता गायब आहे, असे सांगत पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी कंपन्यांची यादीही दाखवली. तसेच, नंदकिशोर चतुर्वेदीने 8 दिवसांपूर्वी 7 कोटींचे मनी लाँड्रिंग केल्याचे समोर आले आहे. यावरून ठाकरे कुटुंब या चतुर्वेदीचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करत असल्याचे का मानू नये, असा सवालही सोमय्यांनी केला.
पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे हवाला किंग चतुर्वेदीशी आर्थिक व्यवहार होते. त्यांचे अनेक गैरव्यवहार आता बाहेर आले आहेत. याचा तपास करण्याची विनंती मी तपास यंत्रणांना विनंती केली होती. तेव्हापासून चुतर्वेदी गायब असल्याचे आढळले आहे. मुख्यमंत्र्यांनीच सांगावे चतुर्वेदी कुठे आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.