महाराष्ट्र

भाजप-मनसे युती होणार का? वाचा, शरद पवारांचं सूचक विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 April :- राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणापासूनच भाजपा आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी भाजपावर टीका करणं टाळून फक्त महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर टीका केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मनसे भाजपासोबत जाऊन कडवं आव्हान उभं करणार का? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता शरद पवारांनी केलेलं सूचक विधान मनसेच्या भविष्यातील राजकारणाविषयी तर्क-वितर्कांमध्ये भर घालणारं ठरलं आहे.

जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनसेच्या राजकीय भवितव्याविषयी देखील भाष्य केलं. सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता आत्तापर्यंत तसं काही झालं नसल्याचं शरद पवार म्हणाले. “ते मला सांगता येणार नाही. आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये”, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी सध्या चर्चेत असलेल्या भाजपा-मनसे युतीविषयी माध्यमांनी विचारणा करताच शरद पवारांनी ते शक्य असल्याचं नमूद केलं आहे. “मी सांगू शकत नाही. पण दोघांचंही लक्ष सध्या सत्तेत असणाऱ्या संघटनेवर आहे. त्यांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.