पुन्हा टेन्शन! देशात कोरोना रुग्ण वाढू लागले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 April :- करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असतानाच आता चौथ्या लाटेचे संकट घोंगावताना दिसत आहे. देशातील काही भागांत पुन्हा एकदा करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कोविड अजून गेलेला नाही, असे नमूद करत सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन आधीच केले आहे.
करोनाच्या चौथ्या लाटेची भीती आधीपासूनच व्यक्त करण्यात आली आहे. त्यात अनेक शहरांत करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. हरयाणातील गुरुग्राममधील स्थिती चिंता वाढवणारी आहे. तेथील कोविड पॉझिटिव्हिटी रेट वाढून आता ८.५ टक्के इतका झाला आहे. हरयाणात बुधवारी एकूण १७९ नवीन बाधितांची नोद झाली होती. त्यापैकी १४६ रुग्ण एकट्या गुरुग्राम येथील होते. याशिवाय दिल्लीतील अनेक भागांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या दुपटीने वाढली. गुरुवारी दिल्लीत ३२५ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. दिल्लीतील कोविड पॉझिटिव्हिटी रेट सध्या २.३९ टक्के आहे. दिल्लीतील काही शाळांमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. शाळेत एकजरी रुग्ण आढळला तरी शाळाच बंद करण्यात यावी वा संबंधित विंग बंद ठेवली जावी, असे निर्देश दिले गेले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा येथे चार शाळांमध्ये करोनाचे १९ रुग्ण आढळले असून खबरदारी म्हणून शाळा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मुंबईतही दैनंदिन रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. बुधवारी मुंबईत ७३ नवीन रुग्णांची भर पडली होती. १७ मार्चनंतरचा हा सर्वाधिक आकडा ठरला होता. गुरुवारी मुंबई महापालिका हद्दीत ५६ नवे रुग्ण आढळले.
दरम्यान, केंद्र सरकारचं या स्थितीवर बारीक लक्ष आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरयाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना ८ एप्रिल रोजी पत्र पाठवून वाढत्या रुग्णसंख्येबाबत अलर्ट केलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही लोकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
‘ करोना महामारी अजून गेलेली नाही. त्यामुळे कोविड अनुरूप वर्तन ठेवावे लागेल व आवश्यक काळजी घ्यावी लागेल,’ असे ते म्हणाले होते. एक्सई व्हेरिएंटबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अशावेळी सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. उद्या काय घडणार हे आजच आपल्याला सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले होते.