महाराष्ट्र

सोमय्यांना अखेर दिलासा; उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 April :- INS विक्रांतप्रकरणावरून अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना अखेर उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अटकेची टांगती तलवार असणाऱ्या किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. INS विक्रांतप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यास 50 हजारांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, सोमवारपासून ( ता. 18) सलग चार दिवस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना कालच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी बजावले होते. मात्र, आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली बाजू मांडली. मात्र, आता उच्च न्यायालयाकडूनच किरीट सोमय्यांना अटकेकपासून संरक्षण मिळाल्याने भूमिगत झालेले किरीट सोमय्या लवकरच समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

INS विक्रांतप्रकरणी यापूर्वी सत्र न्यायालायने किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर INS विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी जनतेकडून 57 कोटी गोळा केले. मात्र, ते पैसे राजभवनाकडे दिलेच नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मुंंबईचे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांनी याप्रकरणी किरीट सोमय्यांवर ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्सही बजावले होते. मात्र, अद्याप ते पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत. मात्र, आता न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून त्यांना पोलिसांसमोर हजर रहावे लागणार आहे.