महाराष्ट्र

पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिस तपासात माहिती उघड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 April :- शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आलेली असताना आता त्यांची पत्नी जयश्री पाटील यासुद्धा अडचणीत आल्या आहेत. सरकारी वकील यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांना वॉन्टेड म्हटले आहे. जयश्री पाटील यांनीच हे आंदोलन करायला सांगितले, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात या आधारेच पोलिसांकडून कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी अ‍ॅड जयश्री पाटील यांचा शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यावरदेखील गुन्हा दाखल केला आहे. 7 एप्रिलला रात्री 11 ते 8 एप्रिल पहाटे 2 वाजून 50 मिनिटे या कालावधीत गुणरत्न सदावर्ते, अभिषेक पाटील, जयश्री पाटील आणि कोअर कमिटीतील इतर लोकांची सदावर्ते राहत असलेल्या क्रीस्टील टॉवरच्या टेरेसवर मीटिंग झाली. असे पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले आहे.

याच मीटिंगमध्ये जयश्री पाटील यांनी पवारांच्या घरावर आंदोलन करण्यास सांगितले, असे पोलिसांना आढळून आले आहे.या प्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार आहेत. जयश्री पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले.

सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून छोटी रक्कम मुद्दाम घेतली. कारण त्याचा गाजावाजा होणार नाही. यासाठी छोटी रक्कम जमा केली गेली. पण कर्मचाऱ्यांकडून जमा केलेली रक्कम आंदोलनाकरता खर्च केली गेली नाही. विशेष म्हणजे सदावर्तेंना बाहेरुन फंडींग मिळत होते, असे प्रदिप घरत यांनी सांगितले आहे. तर 2 कोटी रुपये जमा झाले होते ते पैसे जयश्री पाटील यांना देण्यात आले. असेही घरत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी नागपुरच्या व्यक्तीने गटागटाने सिल्व्हर ओक जवळील मैदानात एकत्र या, असे सांगितले असल्याचे पोलिसांना तपासात समजले. गार्डनमध्ये जमल्यावर अभिषेक पाटील यांनी कळविताच नागपूरच्या व्यक्तीने पत्रकारांना पाठविण्यास सांगितले. अशी धक्कादायक माहिती पोलिसतपासात पुढे आली आहे.