महाराष्ट्र

राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 April :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच झालेल्या ठाणे येथील उत्तर सभेत त्यांनी भाषण केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी सभेत भाषणापुर्वी उपस्थितांना तलवार दाखवली होती. याप्रकरणीच नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राज ठाकरे यांच्याशिवाय मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव आणि नरेंद्र जाधव यांच्यासह 7 ते 8 मनसैनिकांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिस राज ठाकरे यांच्या भाषणाचीही तपासणी करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेतर्फे आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत राज ठाकरेंविरोधात राज्याच्या गृहविभागाकडून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे व मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

​काल ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत मनसेतर्फे राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला मनसे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार होती. मात्र, प्रत्यक्षात पावणे आठवाजेच्या सुमारास राज ठाकरे व्यासपीठावर हजर झाले. त्यापुर्वी ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

ठाण्यात सभेवर येताच मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार जल्लोष केला व राज ठाकरे यांच्या नावाने घोषणा दिल्या. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरेंकडे तलवार सुपूर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज ठाकरे यांनी ती तलवार उपस्थितांना दाखवली. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे तलवारीचे प्रदर्शन करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याची दखल घेत ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनने याप्रकरणी राज ठाकरेंसह मनसैनिकांवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिस यापुढे काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.