महाराष्ट्र

मोठी बातमी! ग्राहकांना ‘वीज’ दरवाढीचा मोठा धक्का

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 April :- वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा महागल्याने वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते २५ पैसे जादा मोजावे लागणार असल्याने १०० युनिटपर्यंत १० रुपये, तर ३०० युनिटपर्यंत ६० रुपयांचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडणार आहे.

राज्य वीज नियामक आयोग बहुवार्षिक वीजदर ठरवताना वीजखरेदीचा सरासरी खर्च लक्षात घेऊन वीजदर निश्चित करत असते. त्यानुसार आताचे वीजदर मार्च २०२० मध्ये जाहीर झाले. त्यावेळी इंधनखर्चात होणारी वार्षिक वाढ लक्षात घेऊन डिसेंबर २०२१ पर्यंत इंधन समायोजन आकार म्हणजेच इंधनावरील वाढीव खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी लागू केला जाणारा आकार वीजग्राहकांना आकारला जाणार नाही, अशारितीने रचना करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात कोळशाचे दर वाढले आणि आता डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात वीजखरेदीवरील वाढीव खर्च वसूल करण्यासाठी मार्च ते मे २०२२ या काळातील वीजवापरावर महावितरणच्या वीजग्राहकांवर इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. मार्चमधील वापराची वीजदेयके आता एप्रिलमध्ये येतील़ त्यामुळे या महिन्यापासून जूनपर्यंत हा इंधन समायोजन आकार लावण्यात येणार आहे.

महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट १० पैसे, दरमहा ३०० युनिटपर्यंतच्या वीजवापरासाठी प्रति युनिट २० पैसे तर त्याहून अधिक वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट २५ पैसे इंधन समायोजन आकार लागू होणार आहे. त्यामुळे १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांवर १० रुपयांचा तर ३०० युनिट ग्राहकांवर ६० रुपयांचा बोजा पडणार आहे.

उद्योग-वाणिज्यिक ग्राहकांवर इंधन समायोजन आकारापोटी प्रतियुनिट १५ ते २५ पैशांचा बोजा पडणार आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील वीजमागणीत विक्रमी वाढ झाली. ही मागणी भागवण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल २ हजार मेगावॉट वीज विकत घेण्यात आली. केवळ मार्चमधील तो खर्च ४५० कोटी रुपयांचा आहे.

अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. याकाळातील महाग वीज खरेदीचा खर्च आणखी होणार आहे. त्यामुळे मार्च ते मे २०२२ या काळातील महाग विजेचा बोजा हा त्यानंतरच्या काळात पडणार आहे. एकंदरच पेट्रोल, डिझेलनंतर आता वीज महागाईचे चटकेही लोकांना सहन करावे लागणार आहेत.