महाराष्ट्र

फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर ओढले ताशेरे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 April :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक देत दगडफेक आणि चप्पलफेक केली. राज्यभरातून या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण लागल्याचे दिसून येत असून मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावरून मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले हे मीडियाला माहित होतं, मग पोलिस काय करत होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच पोलिसांची चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकारणात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही, मग ते कोणत्याही पक्षाची असू दे. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले. ते अतिशय भयावह असे चित्र होते, असे फडणवीस म्हणाले.

संपूर्ण प्रकरणाची मीडियाला अगोदर माहिती होते. त्यांना दुपारी अडीच वाजता मॅसेज आले होते. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात आणि याची कल्पना पोलिसांना नाही. जर कॅमेरामॅन आधी पोहचत असतील, तर पोलिस काय करत होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच या सर्व बाबींची तपासणी व्हायला पाहिजे. तसेच पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

याशिवाय, शुक्रवारी शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत हल्ल्याचा निषेध दर्शवला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अचानक हल्लाबोल केला. आंदोलक पळत आले व त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाने शरद पवार यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. तसेच काहींनी दगडफेक केली. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांना एसटी कर्मचाऱ्यांशी शांततेच्या मार्गाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.