महाराष्ट्र

पहाटेचा शपथविधी चालतो; गडकरींसोबत जेवण केलं तर तुम्हाला मळमळ होते?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट पार पडली आहे. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजपची युती होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या भेटीवरुन राज्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यावरुन मनसेचे राज्य सचिव व प्रवक्ते योगेश खैरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले आहे. खैरे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे.

”भाजपाला तुम्ही न मागता दिलेला पाठिंबा चालतो…त्यांच्याशी पहाटेचा शपथविधी चालतो आणि आमच्या नेत्यांनी बरोबर जेवण केले तरी तुम्हाला मळमळ होते! आपको ये बात कुछ हजम नही हुई… हाजमोला खाओ खुद जान जाओ,” असे ट्विट योगेश खैरे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाकरे-गडकरी भेटीवर टीका केली आहे.

पुढे खैरे म्हणाले की, काल राजसाहेब आणि गडकरी साहेबांनी एकत्र जेवण केले, त्यामुळे यांच्या(महाविकास आघाडी) पोटात मळमळ सुरू झाली. मनसे आणि भाजपा युतीचा सध्या तरी काही प्रस्ताव नाही. पण तशी झाली तर ती अभद्र युती आणि ज्या शिवसेनेने खालच्या भाषेत तुमच्या नेत्यांवर टिका केली होती त्यांच्याशी मात्र तुमची पवित्र युती..? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.