महाराष्ट्र

चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काल प्रचारादरम्यान आपल्या सभेवर दगडफेक झाल्याचे भाजप नेते चित्रा वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणावरून चित्रा वाघ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहणार, असा सवाल त्यांनी केला आहे.दगडफेकीच्या घटनेबाबत अधिक माहिती देताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या प्रचारासाठी आमची मुक्त सैनिक वसाहत येथे काल प्रचारसभा सुरू होती.

सभेसाठी आम्हाला पावणे नऊ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. माझे भाषण ठिक 8.40 ला सुरू झाले. कोल्हापूरमध्ये गेल्या महिनाभरात किती महिलांचे विनयभंग झाले, किती महिलांवर बलात्कार झाले, याची माहिती देण्यास मी सुरूवात केली तोच सभेवर दगडफेक झाली. दगडफेक होताच कार्यकर्ते व सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दगडफेक करणारे पळून गेले होते. याविरोधात आम्ही कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी याप्रकरणी तातडीने पाऊले उचलत दोषींवर कारवाई करावी.

राजकारणात कित्येक वर्षे काम करत आहे. आतापर्यंत कित्येक निवडणूक प्रचारांना गेलो. मात्र, असा भ्याड हल्ला आतापर्यंत झाला नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विरोधकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी सत्ताधाऱ्यावंर केला. मात्र, तुमची दहशत गुंड, बलात्काऱ्यांवर बसवा, असेही त्यांनी ठणकावले. ज्यांची समोर येण्याची हिंमत नाही, त्यांनीच दुसऱ्या माणसांकडून ही दगडफेक करून घेतली. भाजपच्या सभेत सहभागी होणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. त्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते.

काल या दहशतीचा आपण प्रत्यय घेतला, असे चित्रा वाघ म्हणाल्या. दगडफेकीवरून चित्रा वाघ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशा घटना घडत असतील तर राज्यातील महिला सुरक्षित कशा राहणार, अशी टीका त्यांनी केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात आतापर्यंत एकदाही बोटभरदेखील प्रतिक्रिया दिली नाही.

कोल्हापूरमध्ये महिला असुरक्षित असतानाही त्यांनी आतापर्यंत कोणतेही पावले उचलली नाहीत. ते अत्यंत निष्क्रिय आहेत, अशी टीका त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही सहानुभूतीच्या लाटेवर नव्हे तर विश्वास आणि विकासाच्या जोरावरच निवडणूक जिंकू, असेही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.