भारत

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 April :- राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई युनिटला पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येची बाब लिहिली आहे. या मेलनंतर एनआयएच्या राष्ट्रीय युनिटनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा कट उघड होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे अज्ञात आरोपीने ईमेलमध्ये म्हटले आहे.

ईमेलमध्ये म्हटले आहे की, तो आणि11 त्याची माणसं पंतप्रधान मोदींना मारण्यासाठी तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आणि 20 स्लीपर सेल आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीकडे असते. पंतप्रधानांभोवतीचे पहिले सुरक्षा वर्तुळ एसपीजी जवानांचे असते. या ईमेलची माहिती एसपीजीलाही देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दोन कोटी लोकांनाही मारण्याचे म्हटले आहे.

या ईमेलमध्ये किती तथ्य आहे आणि तो कुठून आणि कोणी पाठवला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास संस्था करत आहेत. या ईमेलनुसार हल्ल्याची योजना तयार झालेली आहे. या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना हा धमकीचा ई-मेल पाठवला आहे. ज्या ईमेल आयडीवरून हा मेल आला त्याची चौकशी सुरू आहे.

आरोपीचा आयपी अॅड्रेस शोधून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. हा प्रँक मेल आहे का याचाही तपास एनआयए करत आहे. यापूर्वी दिल्लीतील सीमापुरी भागातील एका घरातून आयईडी मिळाल्याची बातमी समोर आली होती. हे प्रकरण अतिशय धक्कादायक होते. जानेवारीमध्ये गाझीपूर फूल मंडीमध्ये सापडलेले हे स्फोटक कुल्लू स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकासारखेच होते, असेही एका वृत्तात सांगण्यात आले होते.