महागाईचा भडका! आता तूरडाळ, गहू महागणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 March :- सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून महिला गहू, बाजरी, तांदळासोबतच वर्षभरातील डाळी भरून ठेवतात. बाजारात नुकतीच नवीन डाळींची आवक सुरू झाली आहे. जालन्यातील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन होते. त्यामुळे जालन्याच्या बजरंग डाळींना राज्यभरात विशेष मागणी आहे. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे डाळींचे उत्पादन ३० टक्के घटल्याने आगामी काळात तूरडाळ पाच टक्क्यांनी महागणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत आहे. यंदा रशियातून गहू आयात होत नसल्याने भारतीय गव्हाला मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात विदेशात गहू निर्यात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गव्हाची आयात कमी होत असल्याने ग्राहकांना गव्हाची खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्रात तूरडाळ, चनाडाळ, मूगडाळ तयार करणारे ७५० कारखाने आहेत. यात मुख्यतः जालना, नागपूर, अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळींचे कारखाने आहेत. ज्यात प्रतिदिन १५ ते ३० हजार टन डाळी तयार होतात.
एकट्या जालना जिल्ह्यात ३० कारखाने असून यंदा २२ कारखान्यांतून प्रतिदिवस ३ हजार टन डाळी तयार होतात. मात्र, डाळीसाठीचा कच्चा माल व शासनाच्या आयात-निर्यात धोरणामुळे डाळीत पाहिजे त्या प्रमाणात मार्जिन राहत नसल्याने यंदा जालना जिल्ह्यातील ८ कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, बजरंग डाळ मिल, पाटणी दाल मिलमधून तयार होणाऱ्या डाळींना चांगली मागणी आहे. महाराष्ट्रातून गुजरात, तामिळनाडूसह दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात डाळी निर्यात होतात. एवढेच नव्हे तर विदेशातील दुबईत निर्यात केली जाते.
या वेळी जालना दाल मिल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विष्णुकुमार चिचाणी म्हणाले की, जालन्यातून औरंगाबाद जिल्ह्यात रोज २० ते २५ टन डाळी पाठवल्या जातात. यात डबल बजरंग डाळीला मागणी आहे. असे आहेत डाळींचे भाव : जाधववाडीच्या नवीन मोंढ्यात अकोला, जळगाव, जालना जिल्ह्यातून तूरडाळ, मूगडाळ, मसुरडाळ, चनाडाळ येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तूरडाळ ८७, ८८, ८९, ९० रुपये प्रतिकिलो उपलब्ध होत आहे. यात अकोल्यातील लालतुरीची डाळ खाण्यास चवदार असून ८७ रुपये, तर जालन्यात ही डाळ गेल्या ७५ वर्षांपासून डबल बजरंग नावाने ओळखली जात असून ८८-९० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.
प्रसिडेंट ही ८९ रुपये किलाेने विक्री होत आहे. मूगडाळ राजस्थान, जळगाव येथून येत असून ८८, ९२, ९८ रुपये किलोने विक्री होत असून महिन्यापासून १ ते दीड रुपयानी महाग झाली आहे. चनाडाळीचे भाव ६०, ६१ रुपयांनी विक्री होत आहे. गेल्या महिन्यात ५७ रुपयांनी विक्री होत होती. जाधववाडीत ६ ते ७ डाळींचे होलसेल व्यापारी असून प्रति व्यापाऱ्याकडे ३० किलोप्रमाणे ३०० कट्टे माल येतो.