दिल्लीत हाय अलर्ट! तहरीक-ए-तालिबानची ई-मेलवरून स्फोटाची धमकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 March :- देशाची राजधानी दिल्लीवर पुन्हा एकदा दहशतवादाचा धोका निर्माण झाला आहे. तेहरीक-ए-तालिबानच्या इंडिया सेलने दिल्लीत हल्ले करण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा सरोजिनी मार्केटसह अनेक बाजारपेठांमध्ये शोधमोहीम राबवली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तहरीक-ए-तालिबानच्या नावाने काही लोकांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत, ज्यामध्ये दिल्लीत स्फोट घडवण्याचे सांगण्यात आले आहे. या लोकांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे या ई-मेल्सची तक्रार केली. यूपी पोलिसांनी तत्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला. त्याचवेळी सरोजिनी नगर मार्केटमध्ये अनेक तास शोधमोहीम राबविण्यात आली.
दिल्लीतील इतर काही बाजारपेठांमध्येही अशीच शोधमोहीम सुरू असल्याची माहिती आहे. सरोजिनी नगर मिनी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक रंधावा यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. धोका लक्षात घेता दिल्ली पोलिसांना मार्केट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी असा कोणताही आदेश नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ‘आमची टीम सरोजिनी मार्केटमध्ये खबरदारीच्या शोध मोहिमेसाठी गेली होती.’