मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर महागला
22 मार्च :- रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे.
याआधी पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दूधाचा दर २ ते ५ रुपये प्रतिलीटर वाढवला होता. त्यामुळे ही वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला भार देत आहेत.
१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर आजपासून (दि. २२) ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. याआधी ६ ऑक्टोबर २०१९ ला हा दर वाढवण्यात आला होता. बीडमध्ये आता सिलेंडरसाठी ९७६ रुपये मोजावे लागणार आहेत.