शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार उचलणार मोठी पावले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 March :- देशात कोरोना शिरकाव झाल्यापासून शाळा आणि शालेय शिक्षणाला मोठा फटका बसला आहे. शिक्षण ऑनलाइन असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर आता शालेय शिक्षण विभागाकडून काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय शिक्षण आणखी उत्तम व्हावे तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.
राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा Dptc मार्फत 5% निधी हा शाळेच्या मूलभूत सोयींसाठी ठेवण्यात आला आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देत आहे असे नाही, तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु असल्याचेही गायकवाड म्हणाल्या.
पुढे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, यावर्षी निजामकालीन शाळांसाठी एकूण 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी तर पुढल्या वर्षी 300 कोटी ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे. तसेच टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे हे कोरोनामुळे समजले आहे त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे. असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या.
यंदा विभागीय स्तरावर सायन्स सिटीज तयार करण्यात येणार आहेत. तसेच इंटिग्रेटेड आणि मराठी- इंग्लिश अशा भाषांमध्ये आभासक्रम तयार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यंदा कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना Good Touch आणि Bad Touch अशाप्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे.राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ट्रेनिससाठी पाठवण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.