आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषधाचा शोध
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 March :- अहमदनगरमधील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आशा कदम यांनी आयुर्वेदीक गर्भनिरोधक औषधाच्या फॉर्मुल्याचे (हर्बल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर्मुल्याचे) पेटंट मिळवले आहे. नगरच्या वनस्पती शास्त्र संशोधन क्षेत्रासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विषयाच्या प्रा. डॉ. कदम-चव्हाण यांनी १० वर्षे सखोल संशोधन आणि प्रयोग करून हे आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध शोधून काढले. या संशोधनात त्यांना त्यांचे मार्गदर्शक अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एम. गायकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या फॉर्मुल्याचा उपयोग करून लवकरच नामांकित औषध निर्माता कंपनीच्या मदतीने हे आयुर्वेदिक औषध टॅबलेट किंवा लिक्विड स्वरूपात बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. या संशोधनाविषयी त्या म्हणाल्या, बहुतेक गर्भनिरोधक औषधांचे स्त्रियांच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होतात. वारंवार ही औषधे घेऊन गर्भ धारणा थांबवणाऱ्या महिलांना जेव्हा मूल हवे असते तेव्हा त्या गोळ्या घेणे थांबवतात. पण गर्भ धारणेत अडचणी निर्माण होतात. काही स्त्रियांना तर गर्भ रहातच नाही.
अनेक वेळा या बाबतीत ते दाम्पत्य निपुत्रिक राहण्याचा धोका असतो. या गोळ्या घेणाऱ्या महिलांना थायरॉइड्स वाढणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, शरीर स्थूल होणे, शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे असे परिणाम होतात. ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम आदिवासी भागात जिथे प्राथमिक उपचाराचा दवाखाना किंवा मेडिकलही नाही, तेथे राहणाऱ्या महिला गर्भ धारणा टाळण्यासाठी काय उपाय करीत असतील याचा अभ्यास मी केला.