बीडमध्ये महाराष्ट्र राज्य १८ व्या बालनाट्य स्पर्धेचे उदघाटन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 March :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची महाराष्ट्र राज्य १८ व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरु झाली आहे. या स्पर्धेचे उदघाटन सोमवार दि. 21 रोजी साहित्यिक डॉ.सतिष साळुंके, डॉ. सुधीर निकम, दै. झुंजार नेताचे उपसंपादक प्रतिक कांबळे, पत्रकार सुनिल डोंगरे, परीक्षक देवदत्त पाठक, मधुमती पवार, उमेश घळसासी, बीड नाट्य स्पर्धेचे समन्वयक मुकुंद धुताडमल यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अठराव्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी अठराव्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.16 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात दहा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत एकूण 211 बालनाट्य संस्था सहभाग घेणार आहेत.
रंगभूमीला उत्तम रंगकर्मीची कमतरता भासू नये आणि लहान वयातील कला कलाकारांमधील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्सहान देऊन भावी काळात त्यांच्यामधून उत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासन बालनाट्य स्पर्धांचे आयोजन गेली सतरा वर्षांपासून करत आले आहे. या वर्षी 18 व्या वर्षात बालनाट्य स्पर्धा पोहोचली आहे. या स्पर्धेतील सर्व बालनाट्य विनामूल्य पाहता येणार आहेत.
आपण या बालनाट्य स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता बाल कलाकारांना प्रोत्साहित करण्याकरिता सर्व रसिक प्रेक्षकांनी दि. 21 ते 23 मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सादर होणारे बालनाट्य मंगळवार दि 22 मार्चला क्षितीजाच्या पलीकडे, जीर्णोद्धार, आम्ही नाटक करीत आहोत, शोध अस्तित्वाचा, कोयत तर बुधवार दि. 23 मार्च रोजी सावली, ड्रामेबाज, प्रायश्चित, कस्तुरी आदी बालनाट्य सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत सादर होणार आहेत.