प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 March : – भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मजूर आहेत असे भासवून वर्षानुवर्ष मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजूर नसुन देखील याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रविण दरेकरांवर करण्यात आला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकरांविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदेंच्या तक्रारीवरुन या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता. या निवडणुकीमध्ये ते निवडून देखील आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. मात्र मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.