महाराष्ट्र

आम्ही जेलला घाबरणारे लोक नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 March :- कुठलाही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे जेलमध्ये ठेवले. काकूलाही १८ महिने तुरुंगात ठेवले होते. तुरुंगात जायला आम्ही घाबरणारे लोक नाहीत. आम्ही जनतेसाठी लढणारे आहोत. राजकीय सुडबुद्धीतून माझ्यावर कारवाई केली जात आहे. पण आम्ही जेलला घाबरणारे लोक नाही असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी पाठवलेली नोटीस आणि त्यांची केलेली चौकशी यावरून भाजपने रान उठविले आहे. त्याचे पडसाद आज विधानसभा सभागृहात उमटले.

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला केला. तत्पुर्वी सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेली नोटीस आरोपी नव्हे, तर जबाब नोंदवण्यासाठी होती. त्यांना अडकवले जात असल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. त्यानंतर फडणवीसांनीही पोलिसांनी चौकशीत कोणते प्रश्न विचारले, याबाबत सभागृहात माहिती दिली.

मला पोलिसांनी आधी जी प्रश्नावली पाठवली होती, त्यावर मी लेखी उत्तर देऊन कळवले. मी याची उत्तरे देणार आहे, असे सांगितले होते. कारण मला विशेषाधिकार वापरायचा नाही. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पण प्रश्नावलीतील प्रश्न आणि काल मला विचारण्यात आलेले प्रश्न यात खूप फरक होता. प्रश्नावलीतील प्रश्न हे साक्षीदारासाठी होते, तर काल मला पोलिसांनी विचारलेले प्रश्न हे आरोपी असल्यासारखे होते असेही ते म्हणाले.