महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच- पटोले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
14 March :- महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे, असे असतानाच काँग्रेसने पुढील मुख्यमंत्री आपला असणार असा दावा केला आहे. 2024 मध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एवढच नाहीतर सत्ता असलेल्या पंजाब सारख्या राज्याची सत्ता देखील काँग्रेसने गमावली आहे. जी 23 या नाराज गटाने अध्यक्ष बदलावा अशी मागणी केली आहे. काँग्रेसची अशी परिस्थिती असताना नाना पटोले यांनी 2024 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, आणि मुख्यमंत्रीही आमचाच होईल असा दावा ट्विटद्वारे केला आहे.
यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. नाना पटोले यांनी याआधीही स्वबळाची भाषा केली होती. त्यावेळी विविध राजकीय चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी देखील स्थानिक निवडणुकात स्वबळावरच लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
काल नाना पटोले यांनी काँग्रेसला मविआत यायचे नव्हते मात्र केवळ भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नसल्याने महाविकास आघाडीत आलो असे वक्तव्य केले होते. तर आज केलेला दाव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकला चलो रेची भूमिका घेणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. आता यावर राष्ट्रवादी आणि शिवसेना काय पाऊल उचलणार हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.