मराठवाडा

वकिलाचा न्यायालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत एका वकिलाने न्यायालयाच्या प्रवेशद्वारात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच वकिलाला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

दररोजप्रमाणे शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज सुरू होते. तसेच न्यायालयात लोकअदालतीचेही कामकाज सुरू होते. यादरम्यान जिल्हा न्यायालय परिसरात असलेले वकील जयपाल मधुकर ढवळे (रा. वसरणी) यांनी अचानक आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जवळ उभे असलेले वकील, पोलिस व काही नागरिकांनी त्यांच्या हातातील पेट्रोलचा डबा बाजूला फेकून दिला. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

वजिराबाद पोलिसांनी अॅड. जयपाल ढवळे यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आपल्या अशिलाचा खटला न्या. बांगर यांच्या दालनात होता. परंतु, त्यांच्याकडून वकिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप अॅड. ढवळे यांनी या वेळी केला. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.