News

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी ‘एक देश एक बाजार’ धोरण

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मोदींच्या मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या अध्यादेशांना मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक ही जवळपास दोन तास चालली, ज्यात वरिष्ठ मंत्र्यांचाही सहभाग होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन अध्यादेशांना मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

त्यापैकी अत्यावश्यक वस्तू कायदा, APAC कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थेट आपला माल विकता येणार आहे. आता देशातील शेतकर्‍यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या निर्णयासंदर्भात संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त कृषी उत्पादनांच्या साठवणुकीची मर्यादा संपुष्टात आणली आहे, केवळ अत्यंत गरजेच्या परिस्थितीत हे करता येणार आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये त्यांची घोषणा केली गेली होती. या आठवड्यात होणारी मोदींची मंत्रिमंडळातील ही दुसरी बैठक आहे.

मोदी सरकारच्या दुसरा कार्यकाळाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. अशा परिस्थितीत सोमवारीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती, ज्यामध्ये एमएसएमई क्षेत्र आणि शेतकर्‍यांबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले होते. देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि त्यादरम्यान अनलॉक 1 अंतर्गत अनेक प्रकारची सूटही दिली जात आहे. दुसरीकडे चक्रीवादळ वादळ आज महाराष्ट्र आणि गुजरातलाही धडकणार आहे, या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांचे लक्ष होते.