महाराष्ट्र

मोठी बातमी, महाविकास आघाडीत धुसफूस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार नव्‍हते; पण केवळ भाजपला सत्‍ता मिळू नये म्‍हणून आम्‍ही मविआमध्‍ये आलो असे मत प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी बीडमध्‍ये व्‍यक्‍त केले आहे. सोनिया गांधी यांची मविआमध्‍ये येण्‍याची इच्‍छा नव्‍हती. म्‍हणून मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्रीपद काँग्रेसने घेतले नाही. काँग्रेसची केवळ एकच इच्‍छा होती; की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे असे ही नाना पटोले यांनी म्‍हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्‍ये सर्व काही अलबेल नाही, हे अनेकदा समोर आले आहे. राष्‍ट्रवादीचे मंत्री मुख्‍यमंत्री ठाकरेंचे ऐकत नाही, तर कधी ठाकरे मुख्‍यमंत्री असताना शिवसेनेच्‍या आमदारांना विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने नाराज असल्याच्या बातम्या येतात. तर काँग्रेसच्‍या मंत्री, आमदारांना राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात गृहित धरले जात नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्‍यात येते. ही धुसफूस अजूनही कायम असल्‍याचे नाना पटोले यांच्‍या एका वाक्‍यावरून दिसून येत आहे. तर काँग्रेस सत्‍तेत समाधानी नसल्‍याचे यामुळे जाणवत आहे.

भाजपकडून राज्‍य सरकार पडण्‍याची घोषणा होताच, नाना पटोले सरकारमध्‍ये खूश नसल्‍याचे वक्‍तव्‍य करताना दिसून येतात. काँग्रेस मविआत खुश नसल्‍याचे विधान याआधी देखील पटोले यांनी केले आहे. बीडच्या गेवराईत आज 14 व्‍या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्‍यांनी हे विधान केल्‍याने राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे.