महाराष्ट्र

दुसरा व्हिडिओ बॉम्ब उद्या-परवा येतोय; पाटलांचा इशारा!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- महाविकास आघाडी सरकारकडून विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सध्या राज्यात सुरू आहे. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, फडणवीस यांनी गिरीश महाजन यांनी अडकवण्याचा डाव सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या फुटेजने भरलेला एक पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास मुंबई सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ पहिल्यापेक्षाही स्ट्राँग असल्याचे म्हटले आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून, आम्ही तुम्हाला त्रास देतो असे सध्या राज्यात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकला. एका व्हिडिओ बॉम्बमुळे सगळे चिडीचूप झाले आहेत. दुसरा व्हिडिओ उद्या-परवा येणार आहे. दुसरा व्हिडिओ पहिल्यापेक्षाही खुप स्ट्राँग असेल. फडणवीस यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील जनता आहे,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मुंबई सायबर पोलिसांनी आज फडणवीस यांची दोन तास चौकशी केली. त्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना माहितीचा सोअर्स कोठून मिळाला हे विचारता येत नाही. मात्र त्यांना ही माहिती कोठून मिळाली हे विचारण्यासाठी चौकशीला बोलवण्यात आले.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली आहे. घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याच्या प्रमाणे दर्जा आहे. त्यामुळे त्याला माहिती कोठून मिळाली हे विचारायचे नसते. मात्र, अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सध्या सुरू आहे,” असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यावरुन राज्यात राजकारण हळुहळू तापताना पाहायला मिळत आहे. असे असताना आता पुन्हा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब येणार आहे. असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. त्यामुळे उद्या-परवा कोणता व्हिडिओ बॉम्ब भाजप टाकणार हे पाहावे लागणार आहे.