Coronavirus: खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत
मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजारांच्या वर पोहचला आहे तर आतापर्यंत २ हजार ४०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजतागायत राज्यातल्या ४ लाख ८३ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील ७२ हजार ३०० पॉझिटिव्ह आले आहेत. ३१ हजार ३३३ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
राज्यात कोविड १९ चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आयसीएमआरने अखेर आरटी पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या एकूण ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत प्रयोगशाळानिहाय तपासणी क्षमता, तपासणीचा भर या सर्व बाबींचा आढावा मुख्य सचिवांकडून घेण्यात आला. शासकीय प्रयोगशाळेत कोविड १९ ची तपासणी निशुल्क करण्यात येत आहे. पण खासगी प्रयोगशाळेत कोविड १९ तपासणीसाठी लोकांना ४ हजारर ५०० रुपये मोजावे लागत आहेत.
खासगी प्रयोगशाळेतील चाचणी दरात वाटाघाटी करुन राज्यात कोविड १९ तपासणीचा निश्चित दर ठरवण्यात येईल. यासाठी राज्यातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसोबत वाटाघाटी करुन कमीतकमी दर निश्चित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे, यात अजय चंदवाले, अमिता जोशी, आरोग्य सेवा आयुक्तालय संचालक यांचा समावेश असणार आहे.
राज्यात मंगळवारपर्यंत ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३) या जिल्ह्यातील कोरोनानं मृत्युमुखी पडले आहेत.