महाराष्ट्र

फडणवीसांना चौकशीची नोटीस मिळाल्यानंतर भाजप आक्रमक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 March :- राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. घोटाळ्याशी संबधित पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिकडे फडणवीसांना देखील जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी रविवारी त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवले होते मात्र, आता पोलिस घरी जाऊन फडणवीस यांचा जबाब घेणार असल्याची माहिती स्वत: ट्विट करुन फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान फडणवीस यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जाऊन बसत आहे. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत.

बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे.