भारत

मुख्यमंत्री बॅनर्जींचा मोठा आरोप

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 March :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयाला यंत्राचा जनादेश असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, अखिलेश यादव यांचा बळजबरीने पराभव करण्यात आला आहे. सपा प्रमुखांनी या जनादेशाला आव्हान द्यावे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे.

तृणमूल प्रमुख ममता म्हणाल्या, ईव्हीएमबाबत अनेक गोंधळ समोर आले आहेत. त्यामुळे वाराणसीच्या अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले. मला वाटतं समाजवादी पक्षाचा बळजबरीने पराभव केला आहे. हा लोकांचा जनादेश नसून यंत्रांचा जनादेश आहे. जर भाजपला असे वाटत असेल की, 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे एवढे सोपे जाईल, तर तसे अजिबात होणार नाही.

2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाच्या वक्तव्याबाबत ममता म्हणाल्या, दोन वर्षांनी काय होईल हे कोण सांगू शकेल? भाजपने केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमातून काही राज्ये जिंकली आहेत, कारण ते 2024 देखील जिंकतील, या विचाराने खुश आहेत, परंतु हे एवढे सोपे असणार नाही.

चार राज्यांतील भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणाले होते की, “मी आज हेही सांगेन की 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर काही राजकीय तज्ज्ञांनी सांगितले होते की, 2017 चे निकाल 2019 चे निकाल ठरवतील. मला विश्वास आहे की यावेळीदेखील ते 2022चे निकाल 2024 चा निकाल ठरवणार असल्याचं म्हणतील.” पंतप्रधानांच्या वक्तव्याचा याच्याशी संबंध जोडला जात आहे.

तृणमूल प्रमुख ममतांनी आरोप करत म्हटले की, यूपीमध्ये विरोधकांच्या मतांच्या वाटणीचा फायदा भाजपला मिळाला आहे. एवढेच नाही तर त्यांनी माध्यमांनाही सोडले नाही. ममता म्हणाल्या, या निवडणुकीत मीडिया ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. कोलकाता येथे उपस्थित पत्रकारांना त्यांनी म्हटले की, तुम्ही लोकांनी इतका प्रचार केला की भाजपला जास्त काम करावे लागले नाही, तुम्ही तुमचे काम केले. ममता म्हणाल्या, आज मी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा यांच्याशी बोलले आणि त्यांना म्हटले की, या निकालाने सपाचे मनोधैर्य खचू देऊ नका.

काँग्रेसवर ताशेरे ओढत ममता म्हणाल्या की, आता भाजपशी लढू इच्छिणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहून उपयोग नाही. मात्र, काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करण्यास ममता यांनी नकार दिला.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी बंगालच्या अर्थसंकल्पावर पत्रकार परिषदेला संबोधित केले. दरम्यान, सीएम ममता यांनी इंधनाचे दर लवकर वाढण्याची भीती व्यक्त केली. दुसरीकडे, नवे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला होता.

बंगाल भाजपच्या विरोधावर ममता म्हणाल्या, अशी वृत्ती मी कधीच पाहिली नाही. मी रेल्वेमंत्री असताना अनेक अर्थसंकल्प सादर केले आहेत. असे कोणी वागत नाही. त्यांना कोणतेही शिष्टाचार कसे पाळायचे हे माहिती नाही. त्याचवेळी सुवेंदू अधिकारी यांची खिल्ली उडवत ममता म्हणाल्या की, जे आपल्याच प्रभागात जिंकू शकत नाहीत, ते फ्लॉप शोमध्ये दिसण्याचा प्रयत्न करत आहेत.