महाराष्ट्र

उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 March :- राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटीची कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. राजकीय नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या मात्र एसटी विलिनीकरणावर मात्र काही तोडगा निघाला नाही. एसटीच्या विलिनीकरणाची मागणी न्यायालयाने नेमलेल्या समितीनेही फेटाळून लावल्यामुळे पेच आणखी वाढला आहे. दुसरीकडे या संपावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरुच आहेत. दरम्यान एसटीच्या मुद्दावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

आज शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी एसटी प्रश्नावर आपले भाष्य केले. ते म्हणाले की, एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला राजकीय पक्ष होता. अडचणीत येण्याइतपत आंदोलन ताणू नये असा सल्लाही आम्ही दिला होता. मात्र, काही उपटसुंभ कामगार नेत्यांच्या पाठीमागे लागल्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. असे आंबेडकर म्हणाले.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एसटी महामंडळाचा निरोप दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारुंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. जेवढे दिवस कामावर गेला नाहीत, त्याची नुकसान भरपाई घेतली जात आहे. पगार कपात होत असल्यामुळे कामावर जावे की नाही, असा प्रश्न आता कामगारांपुढे आहे. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल. असे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडले आहे.

महाविकास आघाडी सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचे आहे. सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष याचा हाच प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांना आपल्या खाजगी बसेस चालवायच्या आहेत. त्यासाठी त्यांना संप साधन मिळाले आहे. असा आरोप देखील यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

मंगळवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, ‘कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत हे सत्य आहे असे सांगत नाही, तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. ते शिष्टाचाराला धरुन नाही,’ असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.