महाराष्ट्र

युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 March :- मंगरूळ दस्तगीर (अमरावती) परिसरात रात्री सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी येथील ३२ वर्षीय युवक चक्क जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. तब्बल दोन तास सदर युवक टॉवरवर असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनास्थळी पोलिस पथकासह अग्निशमन दल व रूग्णवाहिकाही दाखल झाली होती. खनिकर्म विभागाच्या आश्वासनानंतर दुपारी ४.३० वाजता युवक टॉवरवरून खाली उतरला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी असलेल्या अतुल नारायणन भुजाडणे असे या युवकाचे नाव आहे.

नायगाव रेती घाटावर सायंकाळी ६ वाजता नंतर रेतीची भरधाव ट्रकद्वारे अवैध वाहतुक केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो. रात्रभर ही रेतीची अवैध वाहतुक सुरू असल्याने या मार्गावरील नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तहसिल कार्यालयाला यापुर्वी तक्रार देवुन कारवाई झाली नसल्याचा आरोप अतुलने निवेदनातून केला आहे.हेच निवेदन घेवुन तो सोमवारी जिल्हाधिकारी परिसरात दुपारी दिड वाजताच्या सुमारास दाखल झाला होता.

जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुलाच असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील ५० ते ६० फुट टॉवरवर तो चढला. तत्पूर्वी उपस्थित पोलिसांनी त्याला विचारणा देखील केली, परंतु टॉवरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून तो टॉवर चढल्याची माहीती आहे. सुमारे २५ ते ३० फुटावर तो चढल्यानंतर त्याने आपले निवेदन खाली फेकले व जो पर्यंत मागणीची पूर्तता होत नाही तो पर्यंत येथून उतरणार नाही,असा इशारा त्याने दिला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दोन्ही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हा प्रकार पाहण्याकरिता कार्यालयाबाहेर आले. घटनास्थळी पोलिस ताफ्यासह अग्निशमन दल व रूग्णावाहीकेला देखील पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना खाली उतरण्याची विंनती केली तसेच त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता त्याने येथेच गळफास लावण्याचा देखील इशारा दिला.

यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी कारवाई करण्याबाबचे लेखी आश्वासन त्याला दिले. परंतु तो खाली उतरण्यास तयार नसताना अखेर त्याच्या भावाला पाचारण करून त्याला खाली उतरविण्यास लावले. अतुल खाली उतरताच गाडगेनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरात तब्बल दोन तास तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली.