निसर्गाचा कोप!मुंबई,पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते आज अलिबागला धडकण्याचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळं मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. यानुसार राज्यात मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
ताशी 12 किमी वेगानं निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास सुरु आहे. किनारपट्टीवर धडकताना 110 किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्याचा वेग वाढला आहे. तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढं सरकत असल्याची माहिती आहे. यावेळी निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 140 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.